Thursday, 20 October 2011

                                                    जय गुरुदेव    
          मागील लेखात आपण पहिले कि आपल्या शरीरात देव आहे हे सिद्ध झाले. म्हणजे आपल्या देहात जसा जीव आहे तसा देवही आहे. जीवामुळे देह जिवंत राहतो तर देव जीवाला ज्ञान पुरवितो. जीव व देव हे दोन्ही डोळ्यांनी दिसत नाहीत. कारण, जीव व देव निराकार आहेत. जीव चैतन्ययुक्त आहे तसाच देवही चैतन्ययुक्त आहे. जीव अमूर्त आहे देवही अमूर्त आहे. मग जीवात व देवात फरक कोणता  ? जीव हा एकदेशीय आहे. कारण तो या देहातून त्या देहात जातो. देव विश्वव्यापी आहे; सर्वत्रग: सर्वव्यापी आहे. जीव अल्पज्ञ आहे; देव सर्वज्ञ आहे. जीव अज्ञानी आहे; देव ज्ञानी आहे.जीव अज्ञानी असल्यामुळे देव जीवाला ज्ञान पुरवितो. अशाप्रकारे, आपल्या देहास जसा जीवाचा तसाच देवाचाही अत्यंत उपयोग आहे.
               आपल्या शरीरात असलेला आत्मा हाच खरा देव आहे. आमच्या विद्वान साधुसंतांनी त्याला त्याच्या विविध कामावरून विविध नावे दिलेली आहेत. ती अशी :-

                नारत नांदतो तो नारायण म्हणजेच आत्मा.
                                                   आत्मा नारायण सर्वाघटी आहे  l
                                                   आपणामध्ये काय कळो नये  ll 
             तो आत्मा आमचे स्वतः:चे देहात ओतप्रोत  सामावलेला असून तो आमच्यात इतका रमलेला आहे, कि आमच्या रोमारोमात तो भरून राहिलेला आहे. म्हणून त्याला 'आत्माराम' असे नाव दिलेले आहे.
          विश्वात व्यापलेला परमात्मा अलक्ष असलेला लक्षात आणण्यासाठी ठशाच्या रूपाने आमच्या देहात आहे.'विश्वात्मक ठसलेले लक्ष 'म्हणून 'विठ्ठल' म्हटले आहे. कलेवराचा करता म्हणून त्यास 'कृष्ण' म्हटले आहे. शवाला जिवंत ठेवतो तो 'केशव'. इंद्रियरुप अकरा गायींना पाळतो, वळवतो तो 'गोपाळ' म्हणजेच आत्माराम होय.
          ज्या इमारतीत देव राहतो तिला देऊळ असे म्हणतात. देह हि देखील साडेतीन हाताची इमारत आहे व तिच्यात आत्माराम हा देव राहतो म्हणून साधुसंतांनी या देहास देऊळ म्हटले आहे;-
                               देह देवाचे देऊळ l  आत बाहेर निर्मळ ll  

जीवन कलेची साधना या सदगुरू हंबीर बाबा यांच्या ग्रंथातील उतारा आहे.                                                                                              
                                                                                                                                क्रमश:

No comments:

Post a Comment